सिंधुदुर्गातील वादळी वाऱ्याच्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून तातडीने आढावा
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर Nitesh Rane यांनी मंत्रालयात तातडीची आढावा बैठक घेत प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यातील वीज व पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे निर्देश देताना, भविष्यात एल-निनोमुळे हवामानातील बदलांची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सज्ज राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला.
प्रशासनातील सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांशी सतत संपर्कात राहावे आणि मदतकार्य गतीने पूर्ण करावे, अशा सूचनाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


