सिंधुदुर्गात वळवाच्या पावसाचा तिसऱ्या दिवशीही जोर; वीजपुरवठा विस्कळीत, नागरिक हैराण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहत असून, काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे.
कुडाळ, मालवण, सावंतवाडी, कणकवली आणि देवगड तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून, काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण असून आंबा, काजू आणि भातशेतीला या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये विजेच्या तारा तुटल्याने काही भाग अंधारात गेले आहेत. महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उन्हाच्या तीव्रतेनंतर आलेल्या या वळवाच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी सततच्या बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


