गिर्ये बुद्धविहाराचा ५१ वा वर्धापन दिन उत्साहात; सामाजिक न्यायासाठी शासन कटिबद्ध – नितेश राणे
Girye : Nitesh Rane यांनी देवगड तालुक्यातील मौजे गिर्ये येथील बुद्धविहाराच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मागासवर्गीय वस्तींची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून हा उपक्रम राबविणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जिल्ह्यातील बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती आणि समाजकल्याण विभागामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असून सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गिर्ये परिसरातील बौद्ध समाजाने दाखविलेल्या संघटन कौशल्याचे विशेष कौतुक करत सामाजिक ऐक्य आणि विकासासाठी समाजाचा सहभाग प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.


