वेंगुर्ला पिराचा दर्गा जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह; एका मिळकतीचे दोन दस्तावेज, नोंदींमध्येच विरोधाभास
वेंगुर्ला पिराचा दर्गा जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह; एका मिळकतीचे दोन दस्तावेज, नोंदींमध्येच विरोधाभास
वेंगुर्ला-
वेगुर्ला नगरपरिषद हद्दीतील पिराचा दर्गा येथील स. नं. 12, हि. नं. 79 या जमिनीच्या मालकीबाबत सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. कारण या एकाच मिळकतीसाठी दोन वेगवेगळे कायदेशीर दस्तावेज समोर आले असून, दोन्ही दस्तावेजांमधील तारखा आणि नोंदी एकमेकांशी जुळत नाहीत.
उपलब्ध माहितीनुसार, पहिला दस्तावेज दि. 12 डिसेंबर 2014 रोजीचा वसीयतनामा आहे. अॅड. गितांजली एस. पाटणकर, नोटरी, अंबरनाथ यांच्यासमोर नोंदवलेल्या या वसीयतनाम्यानुसार, कै. दाऊदभाई करीमभाई धनजी खोजे यांनी सदर जमीन आपली नात अमतुल हबीब ताजुद्दीन गोलंदाज यांच्या नावे केली आहे. या आधारे अमतुल हबीब या वारस ठरतात.
मात्र दुसरा दस्तावेज दि. 19 डिसेंबर 2017 रोजीचे खरेदीखत आहे. हे खरेदीखत अय्याज शेख यांच्या नावे असून, दुय्यम निबंधक कार्यालय, वेगुर्ला येथे अ. क्र. 930 नुसार दि. 20 डिसेंबर 2017 रोजी नोंदवले गेले. हा व्यवहार विजय गवळी यांनी केल्याचे नोंदी सांगतात.
येथेच प्रश्न निर्माण होतो. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या दप्तरात कै. दाऊद खोजे यांच्या निधनाची तारीख दि. 20 ऑगस्ट 2017 अशी आहे. मग त्यांच्या निधनानंतर चार महिन्यांनी, दि. 19 डिसेंबर 2017 रोजी, त्यांच्या नावाने खरेदीखत कसे झाले? खरेदीखत करण्यासाठी आवश्यक असलेले अखत्यारपत्र तहसील कार्यालयाच्या नोंदीत का आढळत नाही? माहिती अधिकारात मागणी करूनही ते उपलब्ध का होत नाही?
एका बाजूला 2014 चा नोंदणीकृत वसीयतनामा आहे, तर दुसऱ्या बाजूला 2017 चे नोंदणीकृत खरेदीखत आहे. दोन्ही दस्तावेज शासकीय कार्यालयात नोंदवलेले आहेत. मग अशा परिस्थितीत मूळ मालकी कोणाची? एकाच मिळकतीवर दोन वेगवेगळे हक्क कसे निर्माण झाले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
वारसदारांनी याबाबत संबंधित यंत्रणेकडे दाद मागितली असून, अय्याज नजीर शेख व विजय देवाप्पा गवळी यांची या प्रकरणी भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. शासकीय नोंदींमधील हा विरोधाभास कसा निर्माण झाला, याची पडताळणी होणे गरजेचे बनले आहे.