कोकणात महायुतीतच संघर्षाची चिन्हे? अनिकेत तटकरे यांच्या जागेवर राजन साळवींची वर्णी लावण्याची चर्चा

0
97
कोकणात महायुतीतच संघर्षाची चिन्हे? अनिकेत तटकरे यांच्या जागेवर राजन साळवींची वर्णी लावण्याची चर्चा
कोकणात महायुतीतच संघर्षाची चिन्हे? अनिकेत तटकरे यांच्या जागेवर राजन साळवींची वर्णी लावण्याची चर्चा
कोकणात महायुतीतच संघर्षाची चिन्हे? अनिकेत तटकरे यांच्या जागेवर राजन साळवींची वर्णी लावण्याची चर्चा

रत्नागिरी | प्रतिनिधी
महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित मानला जात असतानाच कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. २०२२ मध्ये ज्या पक्षाकडे आमदारकी होती त्या पक्षालाच संबंधित जागा देण्याचा महायुतीतील प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असताना, अनिकेत तटकरे यांच्या संभाव्य जागेवर शिवसेनेकडून राजन साळवी यांना मैदानात उतरवण्याची रणनीती आखली जात असल्याने कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतील एकूण १७ जागांच्या वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार भाजपाला १२, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र दक्षिण कोकणातील जागेवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे, ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले माजी आमदार राजन साळवी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या अनिकेत तटकरे यांच्या विरोधात साळवी यांना उतरवले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असून तेथून रविंद्र फाटक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर शिवसेनेला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जागा देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूर या मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे.
राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना कोकणातील महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here