जपानने भारतीय आंब्यांच्या सहा जातींवर घातली बंदी; हापूस निर्यातीला मोठा फटका
जपानने भारतीय आंब्यांच्या सहा जातींवर घातली बंदी; हापूस निर्यातीला मोठा फटका
भारताकडून जपानला होणाऱ्या ताज्या आंब्यांच्या निर्यातीवर पुन्हा एकदा निर्बंध आले असून, २०२६ च्या आंबा हंगामासाठी जपानने भारतीय आंब्यांच्या सहा मान्यताप्राप्त जातींची आयात स्थगित केली आहे. यामध्ये अल्फान्सो (हापूस), केसर, लंगडा, बागनपल्ली, चोसा आणि मलिका या जातींचा समावेश आहे.
मार्च महिन्यात जपानी निरीक्षकांनी भारतीय प्रक्रिया केंद्रांची तपासणी केली असता धुरीकरण आणि निर्जंतुकीकरण प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचे समोर आले. विशेषतः ‘व्हेपर हीट ट्रीटमेंट’ (VHT) प्रक्रियेतील त्रुटींमुळे जपानने एप्रिल ते जून या मुख्य निर्यात कालावधीसाठी भारतीय आंब्यांवर बंदी लागू केली आहे.
फळमाशी आणि इतर कीटकांचा नायनाट करण्यासाठी वापरली जाणारी VHT प्रक्रिया जपानसाठी अनिवार्य मानली जाते. याआधी फळमाशीच्या प्रादुर्भावाच्या संशयावरून जपानने १९८६ मध्ये भारतीय आंब्यांवर बंदी घातली होती. तब्बल २० वर्षांनंतर २००६ मध्ये ही बंदी उठवण्यात आली होती.
द्विपक्षीय करारानुसार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील मान्यताप्राप्त केंद्रांमधून प्रक्रिया केलेल्या आंब्यांनाच जपानी बाजारपेठेत परवानगी दिली जात होती.
दरम्यान, जपान ही भारताची सर्वात मोठी आंबा निर्यात बाजारपेठ नसली तरी या निर्णयामुळे विशेषतः हापूस उत्पादक आणि निर्यातदारांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.