१ जूनपासून राज्यातील हवामानात बदल; मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा
१ जूनपासून राज्यातील हवामानात बदल; मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा
मुंबई, दि. १ जून : राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. सध्याच्या हवामान स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे संकेत मिळत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणासह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी पावसाच्या सरींवर अवलंबून राहून मान्सूनपूर्व पेरणीची घाई करू नये, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
तसेच विजांच्या कडकडाटादरम्यान स्वतःची आणि पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि उच्चदाब विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.