विकसित महाराष्ट्रासाठी एसटीचा ताफा टप्प्याटप्प्याने ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार
चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई —
‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) ताफा मोठ्या प्रमाणावर ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार सन २०२९ पर्यंत एसटीच्या एकूण ताफ्यापैकी ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के आणि २०४७ पर्यंत १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ई-बसेसच्या प्रभावी संचालनासाठी राज्यभर आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ज्या मार्गांवर पर्यावरणपूरक ई-बसेस चालविण्यात येणार आहेत, त्या मार्गांचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सखोल अभ्यास करण्यात यावा. यामुळे प्रवासी संख्या, अंतर, चार्जिंगची गरज आणि मार्गावरील वाहतूक परिस्थिती यांचे अचूक नियोजन करता येईल.
तसेच, पुरवठादाराकडून नवीन ई-बसेस प्राप्त झाल्यानंतर पुढील सात दिवसांच्या आत त्यांची तपासणी व निरीक्षण पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ई-बसेसच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र ‘इकोसिस्टिम’ विकसित करण्यावरही भर देण्यात आला.
खासगी बससेवा ज्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत, त्या मार्गांचाही अभ्यास करून तेथे ई-बसेसचा सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (दूरदृश्य प्रणालीद्वारे) (Pratap Sarnaik) (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र (Lokesh Chandra), अपर मुख्य सचिव संजय सेठी (Sanjay Sethi), एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर (Dr. Madhav Kusekar), मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे (Kaustubh Dhavse) तसेच उपसचिव चेतन निकम (Chetan Nikam) उपस्थित होते.


