पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळमध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

0
12
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळमध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळमध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळमध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

कुडाळ  — पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि युवासेनेच्या वतीने कुडाळ शहरात माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख Vaibhav Naik यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान वाढत्या महागाईवर भाष्य करणारे “सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है” हे गाणे तसेच पंतप्रधानांच्या महागाईविरोधातील जुन्या भाषणांच्या ध्वनिफिती स्पीकरद्वारे वाजवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. वैभव नाईक यांनी सायकल हातात घेऊन कुडाळ शिवसेना शाखेपासून जिजामाता चौकमार्गे एसटी स्थानकापर्यंत पायी मोर्चाचे नेतृत्व केले.
यावेळी “कहाँ गये, कहाँ गये, अच्छे दिन कहाँ गये?”, “पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, “दरवाढ रद्द करा” अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात वारंवार वाढ झाल्यामुळे भाजीपाला, दूध, खाद्यपदार्थ, बांधकाम साहित्य यांसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत असून त्यांना इंधन मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच, केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे रुपयाचे मूल्य घसरले असून त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४ पूर्वी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून टीका करणारे आज सत्तेत असूनही वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचे ते म्हणाले.
माजी आमदार G. G. Uparkar यांनीही यावेळी सरकारवर टीका करत, महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शेतकऱ्यांना शेती हंगामाच्या तोंडावर इंधन उपलब्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे महागाई वाढत असून नागरिकांनी याविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, सचिन कदम, शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्यासह शिवसेना, युवासेना व विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here