सिद्धगिरी मठात अत्याधुनिक वन्यप्राणी रेस्क्यू सेंटर, ॲनिमल हॉस्पिटल व पर्यावरण हब उभारण्याचा प्रस्ताव
सिद्धगिरी मठात अत्याधुनिक वन्यप्राणी रेस्क्यू सेंटर, ॲनिमल हॉस्पिटल व पर्यावरण हब उभारण्याचा प्रस्ताव
महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
कोल्हापूर, दि. — सिद्धगिरी मठ (कणेरी), कोल्हापूर येथे अत्याधुनिक वन्यप्राणी रेस्क्यू सेंटर, वाइल्डलाईफ ॲनिमल हॉस्पिटल आणि पर्यावरण हब स्थापन करण्याच्या अनुषंगाने सिद्धिगिरी संस्थानच्या प्रतिनिधींसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूर आणि परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संरक्षण, जखमी व संकटग्रस्त वन्यप्राण्यांवर तातडीने उपचार उपलब्ध करून देणे तसेच वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाला आळा घालणे हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
प्रस्तावित रेस्क्यू सेंटर आणि वन्यप्राणी रुग्णालयामध्ये अपघातग्रस्त, जखमी किंवा आजारी वन्यप्राण्यांवर आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वतंत्र पर्यावरण हब विकसित करण्याचा मानस आहे.
पश्चिम घाट हा जैवविविधतेच्या दृष्टीने जागतिक स्तरावर महत्त्वाचा प्रदेश मानला जातो. या परिसरात विविध दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि वन्यप्राणी आढळतात. त्यामुळे या भागात उभारण्यात येणारे अत्याधुनिक केंद्र वन्यजीव संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे वन्यजीवांच्या बचाव आणि पुनर्वसन कार्याला गती मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाबाबत संशोधन, प्रशिक्षण आणि जनजागृतीलाही चालना मिळणार आहे. तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींना वन्यजीव संरक्षणाविषयी अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.