महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन; सिंधुदुर्ग-कोल्हापुरातून दमदार एंट्री

0
13

महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन; सिंधुदुर्ग-कोल्हापुरातून दमदार एंट्री

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्रात यंदाचा नैऋत्य मान्सून नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधी, शनिवारी (ता. ६) दाखल झाला आहे. मान्सूनने कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये प्रवेश करत राज्यातील पावसाळ्याची अधिकृत सुरुवात केली आहे.
मान्सूनच्या आगमनानंतर राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून, पुढील पाच दिवस कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. तसेच मराठवाड्यातील हवामानही पुढील तीन दिवस पावसासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागांमध्ये वेगाने पुढे सरकणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून इतर भागांमध्ये ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्याही कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम आहे. मराठवाड्यातील बीड, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारनंतर वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here