कोकण रेल्वे भरती मुलाखती विशाखापट्टणमला; उमेदवारांमध्ये नाराजी
कोकण रेल्वे भरती मुलाखती विशाखापट्टणमला; उमेदवारांमध्ये नाराजी
महाराष्ट्राबाहेरील मुलाखत केंद्रांवरून कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचा आक्षेप
रत्नागिरी, दि. ७ जून : कोकण रेल्वेच्या १३२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे घेण्याच्या निर्णयामुळे कोकण व महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने या निर्णयाचा निषेध करत मुलाखत केंद्रे महाराष्ट्रातच ठेवण्याची मागणी केली आहे.
कोकण रेल्वेने १४ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार संबंधित पदांसाठीच्या मुलाखती ८ जूनपासून विशाखापट्टणम येथे ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेशी संबंधित भरती प्रक्रिया असताना मुलाखतीचे ठिकाण महाराष्ट्राबाहेर निश्चित करण्यात आल्याने स्थानिक उमेदवारांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी सांगितले की, कोकण व महाराष्ट्रातील उमेदवारांना मुलाखतीसाठी हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करून शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. बेरोजगार युवकांसाठी हा खर्च परवडणारा नसून अनेक गुणवंत उमेदवारांना या प्रक्रियेपासून दूर राहावे लागू शकते.
समितीने पूर्वीप्रमाणे मुंबई, बेलापूर, मडगाव आणि रत्नागिरी येथे मुलाखतीचे केंद्र ठेवण्याची मागणी केली आहे. उमेदवारांच्या सोयीचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकणातील युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाशी संबंधित हा विषय असल्याने विविध स्तरांतून या निर्णयावर टीका होत असून स्थानिक उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी आंदोलनाचा इशाराही समितीने दिला आहे.