कोकण रेल्वेची लोकप्रिय आणि प्रवाशांच्या जिव्हाळ्याची मांडवी एक्सप्रेस (Mandovi Express) आपल्या सेवेला २७ वर्षे पूर्ण करत आहे. ट्रेन क्रमांक १०१०४ / १०१०३ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन मांडवी एक्सप्रेसच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दि. ०७ जून २०२६ रोजी मडगाव येथे रेलफॅन क्लबच्या वतीने हा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोकण, गोवा आणि मुंबईला जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण रेल्वेसेवेच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.
गेल्या २७ वर्षांत मांडवी एक्सप्रेसने लाखो प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोकण रेल्वेच्या विकासात तसेच पर्यटन, व्यापार आणि सामाजिक संबंध दृढ करण्यात या गाडीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
लोकांना आणि ठिकाणांना जोडण्याचा वारसा जपत मांडवी एक्सप्रेस आजही कोकणवासीयांच्या आणि प्रवाशांच्या पसंतीची गाडी म्हणून ओळखली जाते.