खड्ड्यामुळे रिक्षा पलटी; संतप्त ग्रामस्थांचे रस्तारोको आंदोलन, दोन दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन

0
48
खड्ड्यामुळे रिक्षा पलटी; संतप्त ग्रामस्थांचे रस्तारोको आंदोलन, दोन दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन
खड्ड्यामुळे रिक्षा पलटी; संतप्त ग्रामस्थांचे रस्तारोको आंदोलन, दोन दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन

खड्ड्यामुळे रिक्षा पलटी; संतप्त ग्रामस्थांचे रस्तारोको आंदोलन, दोन दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी-नावळे मार्गावरील कोंडवाडी येथे धोकादायक वळणावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे रिक्षा पलटी होऊन गंभीर अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन करत नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तीव्र उतार, धोकादायक वळण आणि रस्त्यावरील मोठे खड्डे यामुळे रिक्षाने तब्बल तीन पलट्या घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.
हा रस्ता वैभववाडी नगरपंचायतीच्या ताब्यात असून वारंवार तक्रारी करूनही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या दोन महिन्यांत याच ठिकाणी झालेला हा चौथा गंभीर अपघात असल्याचे सांगत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले.
शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संभाजी रावराणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वैभववाडी-नावळे मार्ग रोखून धरत आंदोलन केले. या आंदोलनामुळे वैभववाडी, नावळे आणि शिराळे मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती सांची कोलते, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलनादरम्यान नगरपंचायतीचे अभियंता विशाल होडावडेकर आणि सभापती सिद्धेश रावराणे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
अखेर नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी पुढील दोन दिवसांत खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन मागे घेतले.
यावेळी स्वप्निल रावराणे, गुरुनाथ राणे, प्रकाश राणे, संतोष गुरव, संतोष रावराणे, बाबू रावराणे तसेच रिक्षा चालक, टेम्पो चालक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here