विजयदुर्ग ते वेंगुर्ला सागरी सुरक्षेला बळ; ६० मरीन होमगार्डची नियुक्ती
विजयदुर्ग ते वेंगुर्ला सागरी सुरक्षेला बळ; ६० मरीन होमगार्डची नियुक्ती
सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने ६० मरीन होमगार्डची नियुक्ती केली असून विशेष प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या जवानांना जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्यावर रुजू करण्यात आले आहे.
पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि संवेदनशील सागरी क्षेत्रामुळे महत्त्व असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, निवती आणि वेंगुर्ला या सहा सागरी पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी १० अशा एकूण ६० मरीन होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या किनारी भागात वास्तव्यास असलेल्या तसेच पोहण्याचे कौशल्य असलेल्या स्थानिक युवकांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. हे जवान बंदरे, जेट्टी, लँडिंग पॉइंट, सागरी किनारे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व देखरेखीची जबाबदारी पार पाडणार आहेत. स्थानिक युवकांच्या सहभागामुळे सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मरीन होमगार्डना दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सागरी सुरक्षा, संशयित बोटींची ओळख, बोर्डिंग ऑपरेशन, सागरी गस्त, वायरलेस कम्युनिकेशन, जीपीएस व नेव्हिगेशन, शोध व बचाव कार्य, जेमिनी बोट व इंजिन हाताळणी, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, गुप्तवार्ता संकलन, अग्निशमन तसेच प्रथमोपचार आणि सीपीआर यांसारख्या विषयांचा समावेश होता.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व ६० मरीन होमगार्डना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी जवानांचे अभिनंदन करून सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या योगदानाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. त्यानंतर सर्व जवानांना त्यांच्या नियुक्त सागरी पोलीस ठाण्यांकडे रवाना करण्यात आले.
सिंधुदुर्गच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.