मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत दिवा स्थानकावर नव्या पादचारी पुलाच्या (FOB) उभारणीसाठी महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कल्याण बाजूकडील नवीन पादचारी पुलासाठी गर्डर बसविण्याचे काम १३/१४ जून २०२६ रोजी (शनिवार-रविवार मध्यरात्री) करण्यात येणार आहे.
या कामासाठी रात्री १.२० ते पहाटे ५.४० वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ब्लॉक कालावधीत काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून काही सेवा रद्द, शॉर्ट टर्मिनेट अथवा शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान गैरसोय होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. दिवा स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारा हा नवीन पादचारी पूल भविष्यात प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यास मदत करणार आहे.