वारकऱ्यांच्या सोयीसाठी महामंडळाची विशेष तयारी; पंढरपूर यात्रेसाठी व्यापक नियोजन
वारकऱ्यांच्या सोयीसाठी महामंडळाची विशेष तयारी; पंढरपूर यात्रेसाठी व्यापक नियोजन
मुंबई : आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा तब्बल ५ हजार ५०० विशेष बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील वारकरी आणि भाविकांना पंढरपूर यात्रेसाठी सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी हे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे भाविकांना जवळच्या बसस्थानकापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेस, चालक-वाहक आणि विशेष नियोजनाची तयारी सुरू केली आहे.
यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वेळेवर आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.