महाडमध्ये आधुनिक मच्छी मार्केट उभारणीसाठी निधी उपलब्धतेबाबत मंत्रालयात आढावा बैठक
महाडमध्ये आधुनिक मच्छी मार्केट उभारणीसाठी निधी उपलब्धतेबाबत मंत्रालयात आढावा बैठक
मुंबई
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात अत्याधुनिक मच्छी मार्केट इमारत उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बैठकीत प्रस्तावित मच्छी मार्केट प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भातील विविध तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मच्छी व्यवसायाशी संबंधित व्यापारी, ग्राहक आणि स्थानिक नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
यावेळी संबंधित यंत्रणांना मच्छी मार्केट इमारतीचा परिपूर्ण, सर्वसमावेशक आणि व्यवहार्य प्रस्ताव तयार करून तो १५ दिवसांच्या आत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
महाड शहरातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, मासळी विक्रीसाठी स्वच्छ व सुसज्ज सुविधा उपलब्ध करणे तसेच स्थानिक मच्छी विक्रेत्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लावणे हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीस प्रवीण दरेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त पी. प्रदीप, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.