हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमध्ये ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक - FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांचे निर्देश
हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमध्ये ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांचे निर्देश
मुंबई
राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांनी प्रत्येक ग्राहकाला मोफत आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत.
या निर्देशानुसार संबंधित आस्थापनांनी ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याची स्पष्ट माहिती देणारा सूचना फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य देत हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये सुरक्षित पिण्याच्या पाण्याबरोबरच हँडवॉश, स्वच्छ टॉवेल आणि साबण यांचीही पुरेशी व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असून, त्यामध्ये दंड, परवाना निलंबित करणे किंवा परवाना रद्द करणे अशा कारवाईचाही समावेश असू शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा मिळावी, तसेच अन्न व्यवसायांमध्ये स्वच्छतेचे उच्च मानदंड राखले जावेत, या उद्देशाने हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.