नागपूर विमानतळाचे मिहान इंडिया लिमिटेडकडून जीएमआर एअरोकडे हस्तांतरण
नागपूर विमानतळाचे मिहान इंडिया लिमिटेडकडून जीएमआर एअरोकडे हस्तांतरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळाचे मिहान इंडिया लिमिटेडकडून जीएमआर एअरोकडे हस्तांतरण करण्यात आले.
नागपूर व परिसरात मेन्टेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. या उद्योगांसह कृषी, पर्यटन आदींच्या विकासाला गती मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
या विमानतळावर प्रवासी व कार्गो वाहतूक होण्यासाठी दोन टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या होणे गरजेचे आहे. हस्तांतरणांमुळे आता हा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानतळाला मेट्रो ट्रेन आणि रस्त्यांची उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. विमानतळाचा विस्तार लक्षात घेऊन येत्या काळात सुयोग्य कनेक्टिव्हिटी देण्याच्या दिशेनेही समांतर कार्य सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सांगितले.
नागपूरसह मध्य भारतातील प्रवाशांना उत्तम हवाई वाहतुकीसोबतच कार्गोहबच्या माध्यमातून निर्यातीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. नागपूर हे मध्यवर्ती शहर आहेच पण देशाच्या चारही मेट्रो शहरांसाठी केवळ तासांत संवाद पोहोचणे येथून शक्य आहे. नागपूर हे लॉजिस्टिक कॅपिटल हब म्हणूनही ओळखले जात असल्यामुळे विमानतळाचा विकास तसेच दुसऱ्या धावपट्टीची आवश्यकता या हस्तांतरणामुळे पूर्ण होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांनी नागपूर विमानतळाचे केवळ हस्तांतरणच होणार नसून हा क्षण विदर्भाच्या विकासाचा टेकऑफ असल्याचे सांगितले. विमानतळ हे केवळ प्रवासी वाहतुकीचे केंद्र न राहता उद्योग विकासाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. प्रवासी वाहतुकीसोबतच येथे कार्गो हब होणार असल्यामुळे विदर्भाच्या विकासाचे नवे दालन या विमानतळाच्या माध्यमातून खुले होणार आहे.