गोव्याहून मुंबईकडे अवैध मद्यवाहतूक उधळली; १.५० कोटींचा मुद्देमाल जप्त

0
89
गोव्याहून मुंबईकडे अवैध मद्यवाहतूक उधळली; १.५० कोटींचा मुद्देमाल जप्त
गोव्याहून मुंबईकडे अवैध मद्यवाहतूक उधळली; १.५० कोटींचा मुद्देमाल जप्त

गोव्याहून मुंबईकडे अवैध मद्यवाहतूक उधळली; १.५० कोटींचा मुद्देमाल जप्त

राजस्थानातील चालक अटकेत; टाटा सिग्मा ट्रकसह गोवा बनावटीची दारू जप्त

ओरोस | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध मद्यवाहतुकीविरोधात आणखी एक मोठी कारवाई करत १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोव्याहून मुंबईकडे अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेली मोठ्या प्रमाणातील गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणी राजस्थानातील एका चालकाला अटक करण्यात आली आहे.
शनिवारी (४ जुलै) पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जिजामाता चौक, ओरोस येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयित टाटा सिग्मा दहा टायर ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली.
या प्रकरणी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान १ कोटी १५ लाख २० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू, ३५ लाख रुपयांचा टाटा सिग्मा ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकरअप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, अनिल हाडळ, सहाय्यक फौजदार सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोझा तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजिस्कर आणि ऋषिकेश टोपले यांच्या पथकाने केली.
सिंधुदुर्ग पोलिसांनी अवैध मद्यवाहतुकीविरोधात सलग मोठ्या कारवाया सुरू ठेवल्या असून, या कारवाईमुळे मद्यतस्करांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here