हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य वाटप
हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्य वाटप
“सरपंच अमृत देसाई यांची विकासाची गाडी सुसाट”; पं. स. सदस्या अर्चना बंगे यांचे गौरवोद्गार
कुडाळ | प्रतिनिधी
हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्याचे वितरण करण्यात आले. पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या शेतकरी हिताच्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. बंगे म्हणाल्या की, हुमरमळा-वालावल ग्रामपंचायत नेहमीच लोकहिताचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेते. यावर्षी शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्याचे वाटप करून ग्रामपंचायतीने आदर्श उपक्रम राबवला आहे. गावाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे ही ग्रामपंचायत इतरांसाठीही आदर्श ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच अमृत देसाई, उपसरपंच रश्मी वालावलकर, आदर्श ग्रामसेविका अपर्णा पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत विकासाची वाटचाल करत असल्याचे सांगत त्यांनी ग्रामसेविका अपर्णा पाटील यांच्या कार्याचेही विशेष कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासकीय योजना प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी सरपंच अमृत देसाई यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सौ. बंगे म्हणाल्या, “विकासाच्या दृष्टीने सरपंच अमृत देसाई यांची गाडी सुसाट आहे. गावाच्या प्रगतीसाठी ते अहोरात्र झटत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत नेहमीच तत्पर असतात.”
तसेच माजी आमदार वैभव नाईक यांच्या विकासकामांतील सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला. गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी आणि सहकार्य सातत्याने मिळत असल्यामुळे अनेक विकासकामांना गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतीपूरक साहित्य मिळाल्याने शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीबद्दल समाधान व्यक्त केले.