सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटले पाहिजेत – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटले पाहिजेत – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात स्पष्ट निर्देश; प्रलंबित अर्ज १५ दिवसांत निकाली काढण्याचे आदेश
रत्नागिरी, दि. ७ जुलै :
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी स्तरावरच मार्गी लागल्या पाहिजेत. नागरिकांना आपल्या तक्रारी घेऊन जिल्हास्तरीय लोकशाही दिनात यावे लागू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सागर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जिंदल यांनी नवीन तसेच प्रलंबित अर्जांचा सविस्तर आढावा घेतला. सर्व प्रलंबित अर्ज १५ दिवसांच्या आत निकाली काढावेत, असे निर्देश देताना त्यांनी रस्ते, जमिनीची मोजणी, नुकसानीचा मोबदला, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम यांसारखे विषय ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसीलदार किंवा जास्तीत जास्त उपविभागीय अधिकारी स्तरावरच निकाली निघावेत, असे सांगितले.
“सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या घेऊन जिल्हास्तरीय लोकशाही दिनात येतात, ही बाब योग्य नाही. संबंधित यंत्रणांनी नागरिकांना स्थानिक स्तरावरच न्याय देऊन त्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. नागरिकांवर अन्याय होत असेल तर तो तातडीने दूर करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असेही जिल्हाधिकारी जिंदल यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.