डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील 'सर्वोत्कृष्ट केंद्र' पुरस्कार
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट केंद्र’ पुरस्कार
कृषी अर्गोनॉमिक्स व सुरक्षितता क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधनाची दखल; दापोली विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा
दापोली, दि. ७ जुलै :
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV), दापोलीसाठी अभिमानास्पद अशी आणखी एक कामगिरी नोंदवली गेली आहे. विद्यापीठातील एआयसीआरपी – एर्गोनॉमिक्स अँड सेफ्टी इन ॲग्रीकल्चर अँड अलाइड सेक्टर्स (AICRP-ESAAS) केंद्राला ‘सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कार २०२५-२६’ प्रदान करण्यात आला आहे.
कृषी अर्गोनॉमिक्स आणि कृषी सुरक्षितता क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन, सातत्यपूर्ण प्रयत्न, दर्जेदार कार्य आणि शेतकरी हितासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार केंद्राला बहाल करण्यात आला.
या यशामागे केंद्रातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तांत्रिक कर्मचारी, संशोधक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे समर्पण, सांघिक कार्य आणि अथक परिश्रम असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. तसेच, कुलगुरू डॉ. एस. जी. भावे, संशोधन संचालक डॉ. शहारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. के. जैन, प्राध्यापक व विभागप्रमुख (एफएमपी) डॉ. के. जी. धांडे, तसेच ICAR च्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यही या यशामागे महत्त्वाचे ठरल्याचे सांगण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण AICRP-ESAAS, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली परिवाराचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या सन्मानामुळे कृषी संशोधन, नवोपक्रम आणि शेतकरी कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला आहे.