भूस्खलन, पडझडीतही महावितरणची तत्पर सेवा

0
26
भूस्खलन, पडझडीतही महावितरणची तत्पर सेवा
भूस्खलन, पडझडीतही महावितरणची तत्पर सेवा

भूस्खलन, पडझडीतही महावितरणची तत्पर सेवा

 मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी 
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे भूस्खलन तसेच मोठी झाडे 33 केव्ही वीजवाहिन्यांवर कोसळल्याने मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा शुक्रवारी (दि. 3) खंडित झाला होता. मात्र प्रतिकूल हवामान, घनदाट जंगल आणि डोंगराळ परिसरातील आव्हानात्मक परिस्थितीतही महावितरणच्या अभियंते, कर्मचारी व कंत्राटदारांनी युद्धपातळीवर काम करून काही तासांतच वीजपुरवठा पूर्ववत केला.
दस्तुरी–मंडणगड 33 केव्ही वीजवाहिनीवर भूस्खलनामुळे काही वीजखांब कोसळले, तर दस्तुरी–विसापूर 33 केव्ही वीजवाहिनीवर घनदाट जंगलात मोठे झाड कोसळल्याने दोन्ही मुख्य वीजवाहिन्यांमध्ये मोठा बिघाड होऊन मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच अभियंते व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दस्तुरी–विसापूर वीजवाहिनी घनदाट जंगल व डोंगराळ भागातून जात असल्याने मुसळधार पावसात जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी चालत पेट्रोलिंग करत बिघाडाचे ठिकाण शोधले व वीजपुरवठा सुरळीत केला.
 त्याचबरोबर दस्तुरी–मंडणगड वीजवाहिनीवरील भूस्खलनामुळे कोसळलेले वीजखांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. कार्यकारी अभियंता खेड व उपकार्यकारी अभियंता मंडणगड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक यंत्रसामग्रीसह तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात आली. मुसळधार पाऊस, चिखल आणि भूस्खलनाचा धोका असतानाही अभियंते, कर्मचारी व कंत्राटदारांच्या समन्वित प्रयत्नांतून नवीन वीजखांब उभारून दस्तुरी–मंडणगड वीजवाहिनी पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे सायंकाळपर्यंत मंडणगड तालुक्यासह दापोलीतील प्रभावित गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी मंडणगड–केरीळ 33 केव्ही वीजवाहिनीमध्येही जंगल परिसरात बिघाड झाला. बाणकोट व देव्हारे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसात काम करून हा बिघाडही दूर केला आणि किनारपट्टी भागातील वीजपुरवठा रात्रीच सुरळीत केला.
या संपूर्ण आपत्कालीन कामकाजात रत्नागिरी मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव व रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मंडणगड, कुंबळे, पालगड, बाणकोट, देव्हारे व केळशी शाखांतील अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार आणि स्थानिक सहकाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे वीजपुरवठा अल्पावधीत पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here