Kokan: ….आणि छोटे विद्यार्थी बनले दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे अतिथी संपादक!

0
41
दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे अतिथी संपादक!
….आणि छोटे विद्यार्थी बनले दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे अतिथी संपादक!

दापोली- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले दैनिक वृत्तपत्र असलेल्या दै. सिंधुदुर्ग समाचारने यंदाच्या मे महिन्यात एक अभिनव उपक्रम राबविला होता. दै. सिंधुदुर्ग समाचारच्या संपादिका डाॅ. शर्मिला कदम यांनी मे महिन्यातील रविवार पुरवणीच्या संपादनाची जबाबदारी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथील विद्यार्थ्यांवर सोपविली होती.

चंद्रनगर शाळेतील उपक्रमशील शिक्षक तथा कोकणातील प्रथितयश साहित्यिक असलेले बाबू घाडीगांवकर हे नेहमीच नवोदित लेखक व बालसाहित्यिकांना प्रोत्साहन देत असतात. कोकणातील अनेक नवोदित साहित्यिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीते झाले आहेत. या उपक्रमाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना कागदावर व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपले विचार व्यक्त करता यावेत आणि त्यातूनच बाल साहित्यिक पुढे यावेत यासाठी या अभिनव उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बाबू घाडीगांवकर यांनी काम पाहिले.

चंद्रनगर शाळेतील विद्यार्थीनी पुर्वा जगदाळे हिची अतिथी संपादक म्हणून निवड करण्यात आली होती. या पुरवणीस बालमैफिल असे शीर्षक देण्यात आले होते. ही जबाबदारी पार पाडताना पुर्वा जगदाळे हिच्यासोबत वेदिका मुलुख हिने सहाय्यक संपादक, इशांत पागडे, वैष्णवी आंबेलकर यांनी संपादन सहाय्यक, तर शमिका मुलूख, सौम्या बैकर यांनी मांडणी व सजावटीची जबाबदारी पार पाडली होती.

या पुरवणीत नीरजा वेदक, आरोही मुलूख, विराज मुलुख, प्रसाद शिगवण, दिया मुलुख, मनस्वी आबेलकर, स्वानंदी मोहीत, सोहम घाडीगांवकर, स्नेहा घाडीगांवकर यांनी नियमित लेखन केले होते. या पुरवणीचे अनेक वाचकांनी कौतुक करून बालचमुच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. बालमैफिल पुरवणीच्या संपादनाचे काम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल नुकतेच एका विशेष कार्यक्रमात दैनिक. सिंधुदुर्ग समाचारच्या वतीने या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व छान भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, बालमैफिल पुरवणीचे मार्गदर्शक तथा कोकणातील प्रथितयश साहित्यिक बाबू घाडीगांवकर, शिक्षिका मानसी सावंत, रेखा ढमके आदी उपस्थित होते. एका दर्जेदार दैनिक वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीच्या संपादनाचे काम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here