Maharashtra: गरीबी ते ग्रॅमी अनुभवलेला कलाकार

0
30
zakir husain,
गरीबी ते ग्रॅमी अनुभवलेला कलाकार

मुंबई l संगीत समीक्षक l मयूर कुलकर्णी

कलासृष्टी मध्ये काम करत असताना काही गोष्टी मनाला इतक्या हळव्या करून जातात त्यातील एक दुःखद घटना म्हणजे उस्ताद झाकीरजीचं जाणं. पंडित रविशंकरजींनंतर भारतीय संगीत पाश्चात्य देशात पोहोचवणारे एकमेवद्वितीय असे कलाकार झाकीरजी होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-दापोली-प्रभागस्तरीय-क्र/

प्रतिभावान कलाकार असताना सुद्धा जमिनीवर पाय ठेवून आपली कला वृद्धिंगत होऊ देणे हे उस्तादजींकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते शेवटपर्यंत म्हणायचे की, अभी तो हम सिख रहे है. अनेकदा त्यांचा तबला सोलो अगदी जवळून पाहण्याचा योग आला. एक फोटोग्राफर म्हणून त्यांच्या प्रतिमा संग्रहित करता आल्या. जवळजवळ 25-30 कार्यक्रमांमध्ये मी त्यांचे फोटो काढले. प्रत्येक वेळी फोटो काढताना झाकीरजींच्या चेहऱ्यावरची प्रसन्न मुद्रा असायची ती मला फार विलोभित करून टाकायची. त्यांच्याजवळ गेलो, त्यांना नमस्कार केला की अगदी माता सरस्वतीला वंदन करतोय अशी भावना मनात यायची.

आमची पिढी याबाबतीत खूप भाग्यवान असेल की आम्ही झाकीरजींना पाहिलं, ऐकलं, त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आम्ही जमवून ठेवल्या. त्यांचा शेवटचा सोलो १२ ऑगस्टला अब्बाजींच्या गुरुपौर्णिमेमध्ये ऐकला. तो त्यांचा भारतातील शेवटचा कार्यक्रम. उस्तादजी कधीही स्वतःचा तबला स्वतः स्टेजवर घेऊन यायचे. स्टेजवर आल्यावर खचाखच भरलेलं सभागृह एका क्षणात उभं राहायचं.. टाळ्यांचा जल्लोष.. झाकीरभाईंच्या प्रत्येक समेवर मिळालेली दाद.. अशी सम परत होणे नाही. ६ डिसेंबरला त्यांचा ठाण्यात तबला सोलो होणार होता. मी खूप आतुर होतो या कार्यक्रमासाठी. परंतु देवाच्या मनात फार वेगळंच होतं. आज आमच्या ‘कलाविश्वाचा देव’ आमच्यातून निघून गेला असं आज म्हणू शकतो.

उस्तादजींकडून एकेक गोष्ट घेण्यासारखी होती त्यांचं कलेप्रती असलेले प्रेम, बुद्धीचातुर्य, प्रामाणिकपणा, रसिकांबद्दल असलेला आदर इत्यादी गुण वाखाणण्याजोगे होते. एक कलाकार आणि त्यासोबतच एक माणूस म्हणून झाकीरजी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते. अनेक वर्ष अमेरिकेत राहून सुद्धा त्यांनी नागरिकत्व भारताचे ठेवलं होतं. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, ग्रॅमी अवॉर्ड असे अनेक नामांकित पुरस्कार त्यांना आजपर्यंत मिळाले. आज त्यांच्या जाण्याने हिंदुस्तानी संगीत खऱ्या अर्थाने पोरकं झालं.

या 73 वर्षाच्या आयुष्यात झाकीरजींनी सुरुवातीला गरिबी पण अनुभवली आणि संगीतातला सगळ्यात मोठा पुरस्कार ग्रॅमी पण अनुभवला. खऱ्या अर्थाने उस्ताद जी आपला आयुष्य कलेसाठी जगले आणि कलेप्रती आपलं आयुष्य समर्पित केलं.. ‘झाले बहु होतील परी या सम हा’…!

mayurklk55@gmail.com

छायाचित्र :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here