कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेश 2026-27 साठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ
कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेश 2026-27 साठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारांच्या हितास्तव केंद्रीकृत प्रवेश नोंदणी (CAP Registration) आणि केंद्रीकृत प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना आता 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.
सीईटी कक्षाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अद्याप अर्ज प्रक्रिया पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, मत्स्यव्यवसाय, वनीकरण तसेच इतर कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ दिलासा देणारी ठरणार आहे.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती आणि ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांनी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.