अजिंक्य रहाणे यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
अजिंक्य रहाणे यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई :
भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह, संयमी आणि जिद्दी फलंदाज म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात सुनेत्रा पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेटचा विश्वासार्ह, संयमी आणि जिद्दी चेहरा असलेले अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या शांत नेतृत्वाने, उत्कृष्ट फलंदाजीने आणि देशासाठी दिलेल्या अविस्मरणीय योगदानाने त्यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमचे स्थान निर्माण केले आहे.”
रहाणे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ते भारतीय क्रिकेटमधील एक आदर्श खेळाडू म्हणून ओळखले जातात.
विशेषतः परदेशी दौऱ्यांवरील त्यांच्या दमदार खेळी, संकटसमयी संघाला सावरण्याची क्षमता आणि शांत स्वभावामुळे त्यांनी क्रिकेटप्रेमींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. भारतीय संघाच्या अनेक संस्मरणीय विजयांमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.
त्यांच्या उज्ज्वल क्रिकेट कारकिर्दीबद्दल अभिनंदन करत पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.