सुरक्षेच्या कारणास्तव TISS चा ८६ वा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला
सुरक्षेच्या कारणास्तव TISS चा ८६ वा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला
मुंबई, दि. १ :
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) ने आपला ८६ वा दीक्षांत समारंभ कार्यक्रम सुरक्षेच्या कारणास्तव आणि संभाव्य विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, नियोजित कार्यक्रमाच्या अवघ्या ४८ तास आधी हा निर्णय जाहीर करण्यात आला.
या समारंभाला भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत प्रमुख पाहुणे म्हणून २ ऑगस्ट २०२६ रोजी उपस्थित राहणार होते. मात्र, सुरक्षा व्यवस्थेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे संस्थेने कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
TISS प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात, विद्यार्थ्यांची आणि उपस्थितांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच दीक्षांत समारंभाचे पुनर्नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सुधारित तारीख आणि इतर तपशील अधिकृत माध्यमांद्वारे लवकरच जाहीर करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.
या निर्णयामुळे पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काहीशी निराशा व्यक्त होत असली, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.