लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल सन्मानित

0
9
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल सन्मानित
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल सन्मानित

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल सन्मानित

पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पुणे, दि. २ :
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ यंदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.

या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून राष्ट्रभक्ती, साहस, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारा ऐतिहासिक क्षण आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करणे, दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणे, सीमांची सुरक्षा आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात अजित डोवाल यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशाच्या प्रगतीच्या आणि सुरक्षिततेच्या वाटचालीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
अजित डोवाल यांचे जीवन राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी उदाहरण असून, लोकमान्य टिळकांनी दिलेल्या ‘स्वराज्य’ मंत्राच्या रक्षणाची जबाबदारी आज त्यांच्यासारखे समर्पित अधिकारी पार पाडत आहेत. त्यामुळे हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेचाही सन्मान असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी अजित डोवाल यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here