आडेली खुटवळवाडीत 3 वर्षांपासून बीएसएनएल टॉवर प्रलंबित

0
6
आडेली खुटवळवाडीत 3 वर्षांपासून बीएसएनएल टॉवर प्रलंबित
आडेली खुटवळवाडीत 3 वर्षांपासून बीएसएनएल टॉवर प्रलंबित

आडेली खुटवळवाडीत 3 वर्षांपासून बीएसएनएल टॉवर प्रलंबित

ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला दिले निवेदन – जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुराव्याची मागणी

वेंगुर्ला,प्रतिनिधी
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी गावात गेल्या 3 वर्षांपासून बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. याबाबत समस्त आडेली ग्रामस्थ खुटवळवाडी यांनी आडेली ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देत तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.
आडेली गावातील सर्वे क्र. 52/2 वरील शासकीय जमिनीवर बीएसएनएल टॉवर उभारण्याचा प्रस्ताव गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे गावातील मोबाईल नेटवर्कची समस्या कायम आहे. तसेच ग्रामपंचायतीला दरमहा 25 ते 30 हजार रुपये भाडे आणि गावातील युवकाला रोजगाराची संधी मिळण्यापासून देखील गाव वंचित राहत आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, “शासनाची जमीन उपलब्ध असताना देखील टॉवर होत नाही. यावर ग्रामपंचायत आणि सरपंच काय भूमिका घेणार आहेत हे ग्रामस्थांना कळायला हवे. ग्रामपंचायतीने आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे किती वेळा पाठपुरावा केला याचा खुलासा व्हावा.”
ग्रामस्थांनी पुढे म्हटले आहे की, खुटवळवाडीचे ग्रामस्थ प्रशासनाशी थेट लढा देत असताना ग्रामपंचायत मात्र निद्रावस्थेत आहे. वीरभूमी असलेल्या आडेली गावाची ही अवस्था पाहून खंत वाटते.
त्यामुळे सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी वैयक्तिकरित्या किंवा ग्रामपंचायतीमार्फत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्याकडे पत्रव्यवहार करून हा प्रलंबित टॉवर लवकरात लवकर बांधून पूर्ण करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच ग्रामपंचायतीने या विषयावर आतापर्यंत केलेला पत्रव्यवहार, पाठपुरावा आणि ग्रामसभेचा ठराव ग्रामस्थांसमोर सादर करावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन दि. 31/10/23 रोजी देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here