🔥 दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई l 20 जानेवारी
सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. अखेर मुंबई पोलिसांनी ठाण्यातून हल्लेखोराला अटक केली. मात्र सैफच्या घरी हा हल्लेखोर इतक्या सहजपणे कसा घुसला? तेवढ्याच सहजतेने हल्लाकरून तो तिथून कसा बाहेर पडला? यासारखे अनेक प्रश्न मुंबई पोलिसांसह सर्वांनाच पडले होते. त्याची चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्ह्याच्य/
सैफ अली खानच्या घरी काही महिन्यांपूर्वी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी सैफ अली खानने एक खासगी हाउसकीपिंग एजन्सी नेमली होती. याच एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शहजादने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळेस त्याने सैफच्या घराची पाहणी केली होती. ही बाब त्याच्या चौकशीतून समोर आली आहे.
तो सैफच्या घरी गेल्यानंतर त्याने संपूर्ण घराची रेकी केली होती. शिवाय त्याचवेळी सैफच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन त्याने आखला होता. त्यासाठी त्याने सैफच्या घराचा कोपरा अन् कोपरा पाहून घेतला होता. घरात कसे घुसायचे, कुठून घुसायचे हे त्याने याच वेळी पाहून घेतले होते, असे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
त्याने चौकशीत सांगितलेल्या गोष्टी पडताळून पाहण्यासाठी मुंबई पोलीस आता त्याला सैफ अली खानच्या घरी आणि इमारतीच्या परिसरात घेवून जाणार आहेत. त्यानं नेमका सैफ अली खानच्या घरात प्रवेश कसा केला? हल्ला कसा केला? या सर्वाचे रिक्रिएशन पोलिसांच्या माध्यमातून केले जाणार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीचं नाव मोहम्मद शरीफूल इस्लाम शेहजाद आहे. तो 30 वर्षांचा आहे. हा आरोपी चोरीच्या हेतूने त्या घरात शिरला होता. त्याला आज कोर्टात सादर करण्यात आलं. त्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तापसण्यास सुरुवात केली. सैफच्या बिल्डिंगमधील सीसीटीव्हीत आरोपी कैद झाला होता. याच सीसीटीव्हीतील आरोपीच्या चेहऱ्याच्या आधारावर पोलिसांनी इतर सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज स्कॅनिंग करत असताना अंधेरीतील डीएन नगर परिसरात एक बाईकस्वार एका व्यक्तीला सोडत आहे. बाईकवरुन उतरलेल्या व्यक्तीचा तेहरा आरोपीशी मिळता जुळता असल्याने तो हल्लेखोर असल्याचा संशय पोलिसांना आला.
यानंतर सीसीटीव्ही फुटेज स्कॅनिंगमध्ये हल्लेखोर हा वांद्रे स्टेशनजवळ सकाळी 7.05 वाजता दिसून आला. त्यानंतर तो दादर स्टेशन परिसरात पोहोचला. दादरमधील कबुतर खाना परिसरात सकाळी 9.05 वाजता तो एका मोबाईल दुकानातून हेडपोन खरेदी करताना दिसला. यानंतर आरोपी हा वरळीला गेला. त्याने सकाळी 10.33 वाजता एका फूड स्टॉलवर नाश्ता केला.
वरळीत भुर्जी पाव खाण्यसाठी थांबलेल्या आरोपीने त्याचे पैसे गुगल पे च्या माध्यमातून दिले. याच गुगल पे ट्रान्झॅक्शनच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुगल पे केलेल्या आरोपीचे लोकेशन ठाण्यातील हिरानंदानी परिसरात असल्याचं पेलिसांना लक्षात आले.
यानंतर मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या मदतीने ठाण्यातील कासारवडवली परिसरात कोंबिंग ऑपरेशन सुरू केले. कोंबिंग ऑपरेशन करत असताना ठाण्यातील हिरानंदानी परिसरात असलेल्या एका झुडपांजवळ आरोपी लपलेल्याचं पोलिसांना कळाले. त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून आरोपीला रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अटक केली.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ट्वीट करत माहिती दिली की, “16 जानेवारी 2025 रोजी एका अभिनेत्याच्या घरात घुसून एका अनोळखी इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली व त्याच्या हातातील साधनानीशी फिर्यादी, घरातील एका कर्मचारी व अभिनेत्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची तक्रार वांद्रे पोलीस ठाण्यात करण्यात आली. नमुद गुन्हयाच्या तपासासाठी विविध तपास पथके तयार करण्यात आली. गुन्हयाचा तांत्रिक तपास करुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न करण्यात आला. आरोपी हा त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास ठाणे येथून ताब्यात घेतले व त्याच्यावर कलम 311,312, 331 (4), 331 (6), 331 (7) भा. न्या. स अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा बांगलादेशचा रहिवासी असून तो मुंबईत नाव बदलून राहत होता. आरोपीने वरळीत एका क्लबमध्ये यापूर्वी काम केले होते. त्यानंतर त्याने ठाण्यातील एका हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.