साखळोली शाळेत ‘ज्ञानसमृद्धी वाचनालया’चा अनोखा उपक्रम; ‘वाचनालय आपल्या दारी’तून विद्यार्थ्यांच्या घराघरांत पोहोचणार पुस्तके

0
5
; ‘वाचनालय आपल्या दारी’तून विद्यार्थ्यांच्या घराघरांत पोहोचणार पुस्तके
; ‘वाचनालय आपल्या दारी’तून विद्यार्थ्यांच्या घराघरांत पोहोचणार पुस्तके

साखळोली शाळेत ‘ज्ञानसमृद्धी वाचनालया’चा अनोखा उपक्रम; ‘वाचनालय आपल्या दारी’तून विद्यार्थ्यांच्या घराघरांत पोहोचणार पुस्तके

दापोली | प्रतिनिधी: अरविंद मांडवकर
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत जिल्हा परिषद शाळा साखळोली क्र. १ येथे ज्ञानसमृद्धी वाचनालयाच्या वतीने ‘वाचनालय आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा घरी नेण्यासाठी एक पुस्तक देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध समाज घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

याच कार्यक्रमात ज्ञानसमृद्धी वाचनालयातर्फे आयोजित ‘यशवंत विद्यार्थी सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. वाचनालयाचे सचिव संदीप गोरीवले यांनी, “दरमहा विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देऊन वाचनक्रांती घडवूया आणि ज्ञानसमृद्धीचा दीप प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया,” असे प्रेरणादायी आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथपूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या आद्या विनोद गोरीवले, माही सचिन गौरत, मैत्री मनोहर आडविलकर, सिद्धांत शुद्धोधन तांबे आणि सिया महेश देवघरकर या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक समीर ठसाळ यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल वैभवी विनोद गोरीवले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या मागील कार्यकाळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत शिक्षकवृंदाचाही सन्मान करण्यात आला.
संदीप गोरीवले यांनी आपल्या मनोगतात “वाचाल तर वाचाल” हा संदेश आजच्या डिजिटल युगात अधिक महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यासाठी वाचनाची सवय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाचनालयाचे उपाध्यक्ष रामकृष्ण धामणसकर यांनी ग्रंथालयाचे महत्त्व स्पष्ट करताना, “ग्रंथ हेच आयुष्यभर साथ देणारे अक्षय गुरू आहेत. छोट्या-छोट्या पुस्तकांच्या सातत्यपूर्ण वाचनातूनच ज्ञानाचा महासागर तयार होतो,” असे सांगितले.
वाचनालयाचे सदस्य तथा गुहागर महाविद्यालयाचे प्रा. मंगेश गोरीवले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना, “गुरू हे जीवनाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. कृतीशील शिक्षक राष्ट्र घडवतात. संघर्षातूनच व्यक्तिमत्त्व घडते आणि समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते,” असे प्रतिपादन केले.
यानंतर कु. आद्या गोरीवले, शुभ्रा घडवले आणि जिया घाणेकर यांनी मनोगते व्यक्त करून शिक्षक व पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनिल बुरटे होते. यावेळी पोलीस पाटील सुनिल गौरत, देऊळ कमिटीचे अध्यक्ष अनिल शिंदे, दिनेश जाधव, सुरेश बुरटे, अनंत बुरटे, रामकृष्ण (बंडू) बर्वे, सुरेश मिसाळ, केशव गौरत, विनोद गोरीवले, ग्रंथपाल मनोज पवार, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि वाचनालयाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुजीत देवघरकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला ₹५,००० ची देणगी जाहीर केली. तसेच ज्ञानसमृद्धी वाचनालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
‘वाचनालय आपल्या दारी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणारा, ज्ञानाची कास धरण्यास प्रेरणा देणारा आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारा उपक्रम ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here