Kokan: रामराजे महाविद्यालयात विविध स्पर्धा संपन्न

0
25
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे
रामराजे महाविद्यालयात विविध स्पर्धा संपन्न

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l दापोली –

रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी यांचे वतीने रत्नागिरी जिल्ह्यात दि.१४ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन, वक्तृत्व व देशभक्तिपर मराठी समूहगीत गायन स्पर्धांचे विभागवार आयोजन करण्यात आले आहे. दापोली, खेड व मंडणगड या तीन तालुक्यांसाठीची विभागीय स्पर्धा नुकतीच दापोली येथील रामराजे महाविद्यालयात पार पडली. पंचायत समिती दापोली शिक्षण विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोली यांचे वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

दापोलीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचे हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र सांगडे, रामराजे महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदीका राणे, कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे, उपाध्यक्ष प्रा. कुणाल मंडलीक, सहसचिव अरविंद मांडवकर, जनसंपर्क प्रमुख बाबू घाडीगांवकर, ज्येष्ठ पत्रकार सुदेश मालवणकर, प्रशांत कांबळे, आनंद पिल्ले, विषयतज्ज्ञ विद्या सार्दळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुदेश मालवणकर यांनी विद्यार्थ्यांसमोर ‘मऱ्हाटी ते अभिजात मराठी’ पर्यंतचा मराठीचा प्रवास विशद केला. अण्णासाहेब बळवंतराव, रामचंद्र सांगडे, चेतन राणे यांनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुणाल मंडलीक यांनी केले.

या दिवशी पार पडलेल्या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात श्रुती सचिन मिसाळ हिने प्रथम, संजीवनी प्रदीप बालगुडे हिने द्वितीय तर ऋत्वी किशोर पावसे हिने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात सानिया संजय शिंदे हिने प्रथम, आर्या अमित खेडेकर हिने द्वितीय तर इशा नारायण जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले. महाविद्यालयीन गटात कावेरी राकेश चव्हाण हिने प्रथम तर समीक्षा सीताराम चांदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

निबंधलेखन स्पर्धेत प्राथमिक गटात स्वरा सतीश जाधव हिने प्रथम, शताक्षी सखाराम देसाई हिने द्वितीय तर प्रणव राजेंद्र बेलोसे याने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात गार्गी प्रशांत आग्रे हिने प्रथम, मनस्वी मिलिंद लोखंडे हिने द्वितीय तर स्वरा सुरेंद्र महाडिक हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. महाविद्यालयीन गटात दिशा समीर जाधव हिने प्रथम, शालीनी लक्ष्मण कराडे हिने द्वितीय तर शताक्षी संदीप भुवड हिने तृतीय क्रमांक पटकावला.

याशिवाय देशभक्तिपर मराठी समूहगीत गायन स्पर्धेत प्राथमिक गटात रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड या शाळेने प्रथम, एन.के. वराडकर हायस्कूल मुरुडने द्वितीय तर मराठा मंदिर सीबीएसई विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात एन.के. वराडकर मुरुड हायस्कूलने प्रथम, व्ही.के.जोशी करजगाव हायस्कूलने द्वितीय तर चंदुलाल शेट खेड हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.

महाविद्यालयीन गटात चंदुलाल शेट खेड महाविद्यालयाने प्रथम, अण्णासाहेब बेहेरे लवेल महाविद्यालयाने द्वितीय तर रामराजे महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. या विभागीय स्पर्धांसाठी बाबू घाडीगांवकर, राजेश नरवणकर, दीपक कोकणे, अजय साबळे, रेश्मा तांबे, अरविंद मांडवकर, सुनंदा मळगे, आर्या कालेकर, स्वप्नजा शिंदे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विषयतज्ज्ञ विद्या सार्दळ यांनी संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व तांत्रिक बाजू संभाळली. रामराजे महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदीका राणे यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here