मुंबई पोलिसांतील धक्कादायक घोटाळा; अस्तित्वात नसलेल्या १० कर्मचाऱ्यांना ६.५ कोटींचा पगार
मुंबई पोलिसांतील धक्कादायक घोटाळा; अस्तित्वात नसलेल्या १० कर्मचाऱ्यांना ६.५ कोटींचा पगार
मुंबई : मुंबई पोलिस विभागातील एक धक्कादायक आर्थिक गैरव्यवहार समोर आला असून अस्तित्वात नसलेल्या १० बनावट कर्मचाऱ्यांच्या नावावर तब्बल ६.५ कोटी रुपयांचा पगार वितरित करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. हा प्रकार २०१९ आणि २०२० या कालावधीत घडल्याचे समोर आले असून प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या जुन्या ‘सेवार्थ’ वेतन पोर्टलवरील माहिती नवीन सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना हा घोटाळा उघडकीस आला. तपासात असे आढळून आले की, १० गैर-पोलीस व्यक्तींची अधिकृत नोंदींमध्ये कर्मचारी म्हणून नोंद करण्यात आली होती आणि त्यांच्या खात्यात नियमितपणे मासिक पगार जमा केला जात होता.
एफआयआरमध्ये रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भागवत भोसाळे, गुणाजी खवकर, महादेव हळदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या १० बनावट कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
पगाराचे व्यवहार प्रामुख्याने डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० तसेच जून ते सप्टेंबर २०२० या कालावधीत झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात पोलिस दलात कार्यरत नसतानाही त्यांच्या नावावर वेतन काढण्यात आले.
या प्रकरणात लिपिक स्तरावरील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हजेरी नोंदवही, सेवा नोंदी आणि इतर अधिकृत दस्तऐवजांच्या माध्यमातून हे कर्मचारी खरे असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता.
तपासाच्या कक्षेत प्रशासन आणि वेतन विभागातील काही अधिकारीही आले असून माजी प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवदेकर, विजया चव्हाण, मुख्य लिपिक अजय राठोड आणि वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांची नावे समोर आली आहेत. बनावट सेवा ओळखपत्रे आणि योगदान पेन्शन योजनेशी संबंधित बनावट नोंदी तयार केल्याच्या आरोपांवरून विभागाने दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिस विभागातील आर्थिक व्यवहार आणि अंतर्गत नियंत्रण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे.