FSSAI चा डाबर इंडियाला दणका; ‘100%’ दावे असलेल्या उत्पादनांची विक्री थांबवण्याचे आदेश
FSSAI चा डाबर इंडियाला दणका; ‘100%’ दावे असलेल्या उत्पादनांची विक्री थांबवण्याचे आदेश
नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मे. डाबर इंडिया लिमिटेडला दिशाभूल करणारे “100%” दावे असलेल्या खाद्य उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे निर्देश देणारा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
एफएसएसएआयच्या तपासणीत डाबरच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध खाद्य उत्पादनांवर “100% नैसर्गिक”, “100% शुद्ध”, “100% शुद्धतेची हमी”, “100% सेंद्रिय” आणि “100% कोवळ्या नारळाचे पाणी” यांसारखे दावे करण्यात आल्याचे आढळून आले. नियमानुसार अशा प्रकारचे दावे ग्राहकांची दिशाभूल करणारे ठरू शकतात.
विशेषतः डाबर होममेड कोकोनट मिल्क या उत्पादनाची “100% शुद्धता” या दाव्यासह विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. एफएसएस (जाहिरात आणि दावे) विनियम, 2018 नुसार मिश्र खाद्यपदार्थांसाठी अशा प्रकारचा दावा करणे मान्य नाही.
एफएसएसएआयने यापूर्वीही संबंधित फूड बिझनेस ऑपरेटरला (FBO) अशा दिशाभूल करणाऱ्या “100%” दाव्यांबाबत सूचना दिली होती. मात्र, त्यानंतरही समाधानकारक सुधारात्मक कारवाई न झाल्याने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला.
तपासात एफएसएस (जाहिरात आणि दावे) विनियम, 2018 चे उल्लंघन तसेच आवश्यक प्रमाणपत्रांशिवाय सेंद्रिय (ऑर्गेनिक) दावे केल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित उत्पादनांच्या जाहिराती व विक्रीबाबत तातडीने आवश्यक बदल करण्याचे निर्देश डाबर इंडिया लिमिटेडला देण्यात आले आहेत.
ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि अन्न उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये पारदर्शकता राखली जावी, यासाठी एफएसएसएआयने ही कारवाई केल्याचे सांगितले आहे.