घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
ओरोस, दि. ६ ऑगस्ट : घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ च्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र. ६१७४/२०२३ मध्ये दिलेल्या आदेशानुसार जिल्हास्तरावर विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून, या कक्षाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख या कक्षाचे सदस्य असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
बैठकीत सर्व नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यमान घनकचरा व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. कचरा संकलन, वाहतूक व्यवस्था, प्रक्रिया क्षमता, उपलब्ध व प्रस्तावित पायाभूत सुविधा तसेच आवश्यक मनुष्यबळाचा तपशील सादर करण्यास सांगण्यात आले.
अनधिकृत कचरा टाकण्याच्या ठिकाणांची माहिती संकलित करून ती Google Maps किंवा GIS प्रणालीद्वारे चिन्हांकित करावी तसेच त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत व अनधिकृत कचरा विल्हेवाट स्थळांचे जिओ-टॅगिंग करून छायाचित्रांसह अहवाल सादर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय समुद्रकिनाऱ्यांवरील जलक्रीडा उपक्रमांचे नियमन, बीच व्यवस्थापन समित्यांची स्थापना, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी नोडल अधिकाऱ्यांची नोंदणी तसेच चार स्तरीय कचरा वर्गीकरण प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार चैताली सावंत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व्यवस्थापक महेश पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.