मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेजची चमकदार कामगिरी

0
6
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेजची चमकदार कामगिरी
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेजची चमकदार कामगिरी

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेजची चमकदार कामगिरी

११ नामांकने पटकावत साहित्य विभागात दबदबा कायम

दापोली :
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची उत्तर रत्नागिरी विभागीय फेरी बुधवार, ५ ऑगस्ट रोजी लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजने विविध विभागांत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ११ नामांकने प्राप्त केली.
महाविद्यालयाने साहित्य विभागात पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत ६ पैकी ६ स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविण्याचा मान मिळविला. वक्तृत्व (गट अ) स्पर्धेत जान्हवी डोंगरे हिने प्रथम, तर वक्तृत्व (गट ब) स्पर्धेत साईश्वरी पाटणे हिने प्रथम क्रमांक पटकावला. वादविवाद (गट अ) स्पर्धेत पार्थ सामल व जान्हवी डोंगरे या जोडीने तृतीय, तर वादविवाद (गट ब) स्पर्धेत पार्थ सामल व रासिका बर्वे या जोडीने द्वितीय क्रमांक मिळविला. कथाकथन (गट अ) स्पर्धेत श्रुती येलवे हिने तृतीय, तर कथाकथन (गट ब) स्पर्धेत सफा ए. के. हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
ललित कला विभागात सिद्धी मार्चंडे हिने व्यंगचित्र (कार्टूनिंग) स्पर्धेत उत्तेजनार्थ आणि स्थळचित्रकला (ऑन द स्पॉट पेंटिंग) स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले.
संगीत विभागात शार्दूल आठल्ये याने मकरंद सोमण यांच्या साथीने तालवाद्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. आयुष मुलुख याने पाश्चात्य वाद्य एकल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. भारतीय समूहगीत स्पर्धेत पार्थ गावडे, शार्दूल आठल्ये, कांचन आंबेकर, दिविज खेडेकर आणि ऋत्वी टिकेकर यांच्या संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. या सादरीकरणासाठी आयुष मुलुख, वेदांत साठे, जय जाधव आणि मंथन मुलुख यांनी साथसंगत केली.
स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे, साहित्य विभाग समन्वयक प्रा. तेजस मेहता, नाट्य विभाग समन्वयक प्रा. अजिंक्य मुलुख, संगीत विभाग समन्वयक प्रा. अनिरुद्ध सुतार तसेच प्रा. विश्वेश जोशी, प्रा. जान्हवी दिवेकर, प्रा. स्वाती देपोलकर आणि प्रा. सिद्धी साळगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, संचालक रविंद्र कालेकर आणि प्राचार्य डॉ. घनशाम साठे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here