पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे शनिवार, दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात कार्डिओलॉजिस्ट, कार्डिअॅक सर्जन, न्यूरो सर्जन, प्लास्टिक सर्जन, ऑन्को सर्जन, युरो सर्जन, जनरल सर्जन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंतचिकित्सक, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, फुफ्फुसरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्याकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच नागरिकांसाठी रक्तदाब, रक्तशर्करा, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, 2D इको, ईसीजी, प्रयोगशाळा रक्त तपासणी तसेच शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना कार्ड आणि आभा (ABHA) कार्ड नोंदणी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हे शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील बाह्यरुग्ण विभागात (OPD) सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.