कणकवलीत ‘भारुड महोत्सव २०२६’ चे उद्घाटन; समाजप्रबोधनासाठी प्रभावी माध्यम - नितेश राणे
कणकवलीत ‘भारुड महोत्सव २०२६’ चे उद्घाटन; समाजप्रबोधनासाठी प्रभावी माध्यम – नितेश राणे
कणकवली | प्रतिनिधी
कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेतर्फे आयोजित ‘भारुड महोत्सव २०२६’ चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी भारुड आणि भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली.
भारुड आणि भजन ही केवळ मनोरंजनाची साधने नसून संस्कार, सामाजिक जागृती आणि युवा पिढीला सकारात्मक दिशा देणारी प्रभावी माध्यमे असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक विचारांची रुजवण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील विविध गावांमध्ये दरवर्षी भारुड महोत्सव आयोजित करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, कणकवली सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, मनोज रावराणे, कलाकार समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, भजन समितीचे अध्यक्ष प्रकाश पारकर बुवा, नांदगावचे सरपंच रविराज मोरजकर तसेच तालुक्यातील भजन सांप्रदायिक संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
भारुड महोत्सवामुळे पारंपरिक लोककला जतन करण्यासह समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.