भरधाव कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोंवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा मनसेचा इशारा

0
9
भरधाव कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोंवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा मनसेचा इशारा
भरधाव कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोंवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा मनसेचा इशारा

भरधाव कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोंवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा मनसेचा इशारा

दोडामार्ग | प्रतिनिधी
चंदगड–दोडामार्ग मार्गावरून गोव्याच्या दिशेने कोंबडी वाहतूक करणाऱ्या काही टेम्पो चालकांकडून बेदरकार व भरधाव वाहनचालक होत असल्याचा आरोप करत, अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोडामार्ग शाखेने केली आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.
चंदगड–दोडामार्ग मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात कोंबडी वाहतूक करणारी वाहने गोव्याच्या दिशेने जातात. यातील काही वाहनचालक अतिवेगाने तसेच निष्काळजीपणे वाहने चालवत असल्याने या मार्गावर अपघातांचा धोका वाढला असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे. काही चालक झोपेच्या अवस्थेत किंवा मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
नुकताच चंदगड परिसरात झालेल्या अपघातात सोनावल येथील एका युवकाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख मनसेने केला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कोंबडी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी, चालकांची तपासणी तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोंबडी वाहतूक करणाऱ्या काही वाहनांमधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याचा संशयही मनसेने व्यक्त केला असून, याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
या संपूर्ण प्रकारावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास दोडामार्गमध्ये कोंबडी वाहतूक करणारी वाहने अडवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावंकर यांच्यासह संदेश सावंत, नवलू झोरे, अक्षय कुबल, मुकुंद परब, नितीन देसाई, अनुराग रेडकर, नाना देसाई, अर्जुन धुरी, रत्नदीप गवस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here