रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे यांनी नुकतीच दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श मराठी शाळा कुंभवे येथे भेट देऊन शाळेतील विविध शासकीय योजना तसेच उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत प्रधानमंत्री पोषण शक्ति योजना दापोली तालुका अधिक्षक सचिन रेमजे, गावतळे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड, पालगड प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पवार, टाळसुरे केंद्रप्रमुख संजय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
कुंभवे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत केले. कुंभवे शाळेत राबविण्यात येत असलेल्या सर्व शासकीय योजना व लाभार्थी, प्रधानमंत्री पोषण शक्ति योजना, भौतिक सुविधा, शालेय उपक्रम आदींचा शिक्षण समिती सदस्य प्रभाकर गोलांबडे यांनी आढावा घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व गुणवत्तापूर्ण प्रगतीचाही आढावा घेतला. शालेय परिसरातील स्वच्छता तसेच शालेय आवारातील परसबागेबाबत त्यांनी शाळेचे कौतुक केले. कुंभवे शाळेला भौतिक सुविधांच्या बाबतीत कोणतीही उणीव भासू देणार नाही.
शाळेसाठी नियोजित बहुउद्देशीय सभागृह तसेच संरक्षित भिंतीच्या बाबतीत लवकरच पूर्तता केली जाणार असल्याचे प्रभाकर गोलांबडे यांनी सांगितले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ता यादीत आलेल्या कुंभवे शाळेतील कु. अर्णव गोरीवले या विद्यार्थ्याचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर, सुनंदा मळगे, पूनम चौधरी, कोमल मुरुडकर आदी उपस्थित होते.