गावतळे हायस्कूलला ‘माझी शाळा सर्वोत्कृष्ट शाळा’ पुरस्कार
गावतळे हायस्कूलला ‘माझी शाळा सर्वोत्कृष्ट शाळा’ पुरस्कार
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
गावतळे :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे कोल्हापूर विभागातून डॉ. बापूजींच्या स्वप्नांना साकार करणाऱ्या ‘माझी शाळा सर्वोत्कृष्ट शाळा’ पुरस्काराने श्रीमान मथूरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गावतळे या विद्यालयाचा गौरव करण्यात आला.
संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, सहसचिव व अर्थसचिव मिलिंद हूजरे, सहसचिव प्रशासन एस. एम. गवळी आणि सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्राचार्या भक्ती सावंत यांनी २०२४ मध्ये गावतळे हायस्कूलच्या प्राचार्यपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शाळेच्या शैक्षणिक तसेच भौतिक सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. गुणवत्तावाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
पंचक्रोशी स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, परिसरातील दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळण्याबरोबरच शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठीही मोलाचे योगदान लाभले. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून शाळेने गुणवत्ता आणि भौतिक विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
या यशाबद्दल शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशी स्कूल कमिटीचे अध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सामूहिक सहभागाच्या जोरावर गावतळे हायस्कूलने मिळवलेला हा सन्मान शाळेच्या उज्ज्वल वाटचालीतील मानाचा टप्पा ठरला आहे.