गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महावितरणशी संबंधित प्रश्न आणि विद्युत ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आढावा बैठक घेण्यात आली.
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक दाखल होणार आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जात असल्याने जिल्ह्यातील वीजभार वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने आवश्यक ती पूर्वतयारी आणि नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
वीजवाहिन्या, रोहित्रे आणि इतर विद्युत यंत्रणेची आवश्यक तपासणी करून संभाव्य तांत्रिक अडचणी आधीच दूर करण्यावर भर देण्यात आला. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, जयंत लालभांबरे यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.