🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई
राज्यातील तरुणाई, तसेच सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले आहे. त्यानंतर आता राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा… हे राज्यगीत गायले जावे, तसे निर्देश राज्याचे शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना दिले आहेत. https://sindhudurgsamachar.in/
शासन निर्णयानुसार सर्व शाळांचे दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी, राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना/प्रतिज्ञा यासोबत “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत गायले जाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांनी याबाबतची दक्षता घेण्याचे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना आदेशित करण्यात आले आहे.
संचालनालयामार्फत वेळोवेळी VC द्वारे दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी, राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना/प्रतिज्ञा यासोबत “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत वाजविले/गायले जाणेबाबत आपणास यापूर्वी कळवण्यात आले आहे. तसेच शिक्षण आयुक्त यांनी याबाबत तात्काळ अंमलबजावणी करणेसाठी आदेशित केलेले आहे. त्यानुसार निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे सहसंचालक यांनी विभागीय उपसंचालकांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
याबाबतचा जिल्हानिहाय अहवाल उपसंचालकांना सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप पर्यंत सदर बाबतचा अहवाल संचालनालयास प्राप्त झालेला नाही. तरी, याबाबत आपल्या विभागातील जिल्हानिहाय माहिती एकत्रित करून सोबत देण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये भरून संचालनालयास सादर करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.