दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळा कुंभवे येथे नुकतेच ‘साप- शेतकऱ्याचा मित्र’ या विषयावर चर्चासत्र तसेच मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. दापोली येथील वाइल्ड ॲनिमल रस्क्युअर्स या संस्थेच्या सर्पमित्रांनी तसेच वनाधिकाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात उपस्थित सर्पमित्र मिलिंद गोरीवले, तुषार महाडीक, नंदकुमार झाडेकर, मयुर चव्हाण, अक्षय गोंधळेकर, किरण करमरकर, फद जमादार, जुई करमरकर तसेच वन अधिकारी शुभांगी गुरव यांनी कोकणात आढळणाऱ्या सर्व सापांविषयीची सविस्तर व अभ्यासपूर्ण माहिती शाळेतील विद्यार्थी तसेच पालकांना दिली. यावेळी सापांविषयी अधिक माहिती देणारा लघुपट दाखविण्यात आला. कोकणात नाग, कांडर, घोणस आणि फुरसे असे फक्त चारच जातीचे विषारी साप आढळतात. बाकीचे आढळणारे सर्व साप हे बिनविषारी आहेत. मात्र कोणताही साप दिसला की त्याला मारण्याची प्रवृत्ती आजही समाजात दिसते. साप हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यांना कृपया मारु नका.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यात सर्व साप महत्वाची भूमिका बजावतात. एक धामण जातीचा बिनविषारी साप वर्षभरात सुमारे ७२००० उंदरांचा फडशा पाडतो. घरात, शाळेत किंवा इतरत्र साप आढळून आल्यास त्याला न मारता त्वरित सर्पमित्रांना बोलवा. ते लगेच येऊन सापाला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडतील असे आवाहन यावेळी सर्पमित्रांनी केले. कुंभवे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश काष्टे, तसेच मुख्याध्यापिका ज्योती पवार यांचे हस्ते वाइल्ड ॲनिमल रस्क्युअर्स या संस्थेच्या सर्व सर्पमित्रांचा तसेच वनरक्षक शुभांगी गुरव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश काष्टे, शिक्षण तज्ञ रमेश तांबे, दत्ताराम झाडेकर, कुणाल दहिवलकर, शिक्षक बाबू घाडीगांवकर, सुनंदा मळगे, प्रतिक्षा झाडेकर, पुनम चौधरी व अनेक पालक उपस्थित होते.