पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त साहित्य व कलागौरव सोहळा
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त साहित्य व कलागौरव सोहळा
प्रवरानगर :
सहकार चळवळीचे जनक आणि महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात जयंती समारंभ आणि साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात साहित्य, पत्रकारिता, कला, नाट्य आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले. त्यांच्या कार्यातून उभे राहिलेले ‘प्रवरा मॉडेल’ देशासाठी आदर्श ठरले. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून प्रवरा सहकारी साखर कारखान्याने निर्माण केलेली ओळख त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारी आहे.
पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील यांनी सुरू केलेल्या या पुरस्कार परंपरेचा गौरव करताना, साहित्यिक आणि कलावंतांच्या योगदानाचा सन्मान करणारा हा सोहळा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रवरानगरच्या सहकाराच्या या भूमीत येणे विशेष औचित्याचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच कुटुंबातील आप्पासाहेब पवार यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले असल्याने या सोहळ्याशी भावनिक नाते असल्याचेही नमूद करण्यात आले.
प्रवरानगरच्या या सहकार भूमीत शेती, सहकार, उद्योग, शिक्षण आणि संस्कृतीचा सुरेख संगम अनुभवायला मिळत असल्याचे सांगत साहित्य व कलागौरव सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.