‘ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन’ (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारली आहे. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फेडरेशनच्या सर्वसाधारण बैठकीत ॲड. शेलार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना ॲड. आशिष शेलार यांनी ई-स्पोर्ट्स क्षेत्राला अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक स्वरूप देण्यावर भर दिला. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ई-स्पोर्ट्सकडे केवळ मनोरंजन किंवा गेमिंग म्हणून न पाहता कौशल्य, शिस्त, प्रशिक्षण आणि करिअरची संधी असलेले क्षेत्र म्हणून त्याचा विकास करण्याचे आव्हान स्वीकारून काम करणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
युवा पिढीतील डिजिटल कौशल्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मैदानी खेळांप्रमाणेच ई-स्पोर्ट्समध्येही प्रावीण्य मिळविणारे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी विविध राज्यांतील फेडरेशनशी समन्वय साधला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ई-स्पोर्ट्सच्या विकासासाठी केंद्र सरकारशी आवश्यक तो संवाद साधून धोरणात्मक पातळीवरही प्रयत्न करण्यात येतील. देशातील ई-स्पोर्ट्स क्षेत्राला संघटित आणि सक्षम व्यासपीठ देण्याच्या दृष्टीने फेडरेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही नवनियुक्त अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी नमूद केले.