बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत

0
113

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा दफनविधी संपन्न झाला आहे. जुहू येथील कब्रस्थानात त्यांना सुपूर्द ए खाक करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राज्य पोलिसांची बटालियन दुपारी 1.30 च्या सुमारास दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचली होती. दिलीप कुमार यांच्या घरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार होत होते. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील महिन्यात उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. परंतू 29 जून रोजी पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु यावेळी त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर बुधवारी सकाळी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही होते. यासोबतच शासकीय सन्मानात दिलीप कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले होते.अभिनेते धर्मेंद्र यांना दिलीप साहेबांचे अंत्यदर्शन घेताना अश्रू अनावर झाले होते.बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांना दिलीप कुमार यांची अंत्ययात्रा न दाखवण्याची विनंती केली होती. तिने याविषयी सोशल मीडियावर एक खास नोट शेअर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here